Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Test link

अहिराणी लग्नातील गाणी

गंगा जमुना गंगा जमुना दोन्ही खेते गंगा जमुना दोन्ही खेते तठे काय देव पोयाना रोपे तठे काय देव पोयाना रोपे तठे काय सिताबाई खाते तठे काय सिताबाई खाते तठे काय कापुसना बेटे तठे काय कापुसना बेटे इस्नु किस्नु कांडया भरे इस्नु किस्नु कांडया भरे रायरुक म्हणे पोयतं करे
  • गंगा जमुना
गंगा जमुना दोन्ही खेते
गंगा जमुना दोन्ही खेते
तठे काय देव पोयाना रोपे
तठे काय देव पोयाना रोपे
तठे काय सिताबाई खाते
तठे काय सिताबाई खाते
तठे काय कापुसना बेटे
तठे काय कापुसना बेटे
इस्नु किस्नु कांडया भरे
इस्नु किस्नु कांडया भरे
रायरुक म्हणे पोयतं करे
रायरुक म्हणे पोयतं करे
तठलं पोयतं कोणले आणं
तठलं पोयतं कोणले आणं
तठलं पोयतं (वधु/वराचे नाव) ले आणं
तठलं पोयतं (वधु/वराचे नाव) ले आणं
(वधु/वराच्या बाबांचे नाव)ना बाप घोडे उना
(वधु/वराच्या बाबांचे नाव)ना बाप घोडे उना
बाशिंग मोती जडे उना
बाशिंग मोती जडे उना
वाजा गहे रथ उना
वाजा गहे रथ उना
मोती पहे रथ उना
मोती पहे रथ उना



हेच गाणं नंतर ‘बाप’ या जागी मामा, भाऊ, काका, मावसा हे टाकुन म्हटलं जातं
(खान्देशात कापुस फार पिकतो. कल्पना केलीय की गंगा जमुना या पवित्र नद्यांच्या खोर्‍यात आलेल्या देवपह्य म्हणजे देवकपाशीच्या झाडापासुन विष्णु कृष्ण या देवांनी कापुस काढला जिचं राही रुक्मीणीने पोयतं केलं आणि ते सीतामाईने वधुसाठी आणलं. तर वर/ वधुचा बाप/ मामा/ भाऊ/ काका/ मावसा हे घोड्यावरुन ते घेण्यास गेले. आणि त्याला बाशिंग मोती जडलेले होते. बरोबर वाजा म्हणजे बॅन्डबाजा घेउन गेले आणि तिकडुन मोती पये (पोवळे) भरलेला रथ घेउन आले.)
शब्दार्थः
पोयतं: हळद लावलेलं पाच पदरी कच्चं सूत वर/वधुच्या गळ्यात घालतात त्याला पोयतं म्हणतात. वर/वधुला भोवती रांगोळी काढलेल्या पाटावर बसवतात. पाटाच्या चारही कोपर्‍यात तांब्याचे/पितळाचे तांबे ठेवलेले असतात. या चारही तांब्यांच्या भोवतालुन पाच पदरी कच्चं सूत गुंडाळले जाते नंतर हे गाणे म्हणत ते सूत काढुन घेतात. त्याला पाच सवाष्णी भोवती धरुन पाण्यात कालवलेली हळद लावतात. मग ते सूत वधु/वरांच्या गळ्याप्रमाणे अ‍ॅडजस्ट करुन वधु/ वराला घातले जाते.
तठे: तिथे
तठनं: तिथलं
कोनले: कोणाला
उना: आला
आनं: आणलं
देवपह्यः देवकपाशी- ह्या झाडापासुन वर्षभर कधीही कापुस मिळतो.
पये: पवळे

  • तेलन पाडणे
तेलन पाडणे म्हणजे एका वाटीत थोडं गोडेतेल घेउन त्यात देवकपाशीची किंवा आंब्याच्या झाडाच्या काडीला कच्च सूत ५ वेळेस गुंडाळुन ती वाटीत उभी करतात. मग ५ सवाष्णी ती वाटी घरातल्या एकेक देवांवर धरुन खालील गाणे म्हणतात.
तेलन पाडायच्या वेळेस म्हणावयाचे गाणे

समदीर सुकतं पानी मुकतं हळद कुंकू कालव जा
गणपतीवर तेलन पडे सरस्वतीले बलाव जा ||१||
समदीर सुकतं पानी मुकतं हळद कुंकू कालव जा
खंडेराववर तेलन पडे म्हाळसाले बलाव जा ||२||
समदीर सुकतं पानी मुकतं हळद कुंकू कालव जा
कानबाईवर तेलन पडे रानबाईले बलाव जा ||३||
समदीर सुकतं पानी मुकतं हळद कुंकू कालव जा
कुळमातावर तेलन पडे भवानीले बलाव जा ||४||
समदीर सुकतं पानी मुकतं हळद कुंकू कालव जा
शब्दार्थः
कालव जा : कालवुन घ्या.

आता हीच वाटी चुलीवर धरायची आणि खालील गाणे म्हणायचे.

चुल्हा म्हणे मी चुल्हा देव, लाया चंदन कपाय्या
आन शिजे सव्वा खंडी, या आननी किर्ती मोठी
लोक जेवती लखोपती ||१||
शब्दार्थः
कप्पाया: कपाळाला
आनः अन्न

त्यानंतर सवाष्णी ही वाटी विहीरीवर धरतात व हे कडवे गायले जाते.

कांजील म्हणे मी कांजीलपाणी,कांजील कशीयाना राशी
कांजील द्राक्षाना राशी, कांजील वंगळवाणी दिसे
कांजीलले बहुत गोडाई, कांजील पंगती वाढाई
कांजील म्हणे मी कांजीलपाणी, कांजील कशीयाना
राशी कांजील निंबाणीच्या राशी कांजील वंगळवाणी
दिसे कांजीलले बहुत गोडाई, कांजील पंगती वाढाई
कांजील: विहीर

त्यानंतर ही वाटी ताक घुसळायच्या मडक्यावर किंवा उखळावर धरायची.

दारन म्हणे मी दारनदेव, दारन घुसळे ओ कोन
दारन घुसळे ओ सिता, इनी सोनानी रांजनी
इना नागमोडी रई, तुटा तुटा रई दोर, लावा लावा मोत्या सर
इना तांबा ना ओ लोटा, इनी धरमजा वारा
इनी: हिची
सोनानी: सोन्याची
रांजनी: रांजणी
रई: रवी


आता ही वाटी उंबरठ्यावर धरायची

तु उठरे कबाडी खांदी घेतल्या कुर्‍हाडी
डोई घेतल्या भाकरी, गेला डोंगर पखाडी
साग तोडजो निबाडी ,उंबरट गाड्यात घातीला
उंबरट शेल्याने झाकीला टाका सुतारच्या दारी,
उंबरट सुतार घडीया, उंबरट लव्हार जडीया
उंबरट मिनार मढीया, उंबरट वापरे ओ कोन
उंबरट वापरे ओ सिता,
हाती इना रत्ने चुडा, मुखी इना पाननां ईडा
माथी इना भंवर जुडा, हाती चंदननी वाटी
सूर्या शिपडत जाय, बाळ खेळाडत जाय
अर्थः उठ रे कबाडी, कबाडी उठला, कु-हाड घेउन डोंगरावर गेला आणि असली सागाच्या झाडाचे निबर लाकुड उंबरठ्यासाठी तोडुन आणले. हा उंबरट बैलगाडीत घातला, शेल्याने झाकुन सुताराकडे टाकला, सुताराने घडवला, लोहाराने जडवला, त्याला मिनाकारी केली आणि हा असा उंबरठ वापरतय कोण तर सिता माई जिच्या हातात रत्नजडीत चुडा, मुखी पानाचा इडा आहे. जिच्या डोक्यावर भंवर जुडा आहे आणि ती हातात चंदनाची वाटी घेउन उंबरठ्यावर शिंपडतेय. मधेमधे बाळ लुडबुडतोय.

पुन्हा ती वाटी घराजवळच्या उकीरड्यावर नेतात. किंवा घरातलाच कचरा गोळा करुन त्यावर धरतात.

उकीरडा म्हणे मी उकीरडा देव, उखल्ले पुंजा कोन टाके
उखल्लाचे पूजा सिता टाके, हाती सोनाना खरोटा
झाडी उनी गाय गोठा, इनी रुपानी डालकी
इनी मोत्यानी चुमय, इना उकरडा क्यावं मोठा
उखल्ला: उकीरडा
अर्थः उकीरडा म्हणतोय मी उकीरडा देव. कारण यावर पुंजा म्हणजे कचरा कोण टाकतेय तर साक्षात सितामाई. ती सोन्याच्या खराट्याने गायीचा गोठा झाडुन आलीय आणि तिची रुप्याची डालकी म्हणजे टोपली, व मोत्याची चुमय(चुंभळ) आहे.

आता ही वाटी फिरत फिरत दिव्यावर म्हणजे समईवर धरतात. आणि पुढील कडवे म्हनतात.

दिवा म्हणे मी दिवलाया, दिवा निवाजना कोठे
गावत्या आनंदाना पेटे, अरे तू शिलावर भावू
सांग तुनं दिवलायानं मोल, सव्वा लाई वर लाख
देऊ दिवा सोबनले लऊ, दिवाले नवु मणनी वात
दिवाले आनंदानं तेल, दिवा जळे मांडवात
या वर्‍हाडी वापरती, कलाबूत झळकती

असं फिरत फिरत सर्वात शेवटी ही वाटी नवरदेववर/ नवरीवर धरतात. शेवटचे कडवे:

हाई काय सुतारनं पाट वर काय परभूतानी घडी
वर मोतीनं चौक भरी, हाई काय कसारनी वाटी
हाई काय नागिननं पान, हाई काय सरावन कांड
याले काय कच्चे सुतं गुंड, हाई काय तेलनीनं तेल
अरे तु नंदूराया तेली, तुन्ही चिंचोलानी लाट
तुना अंबियाना घाना, हाउ काय सोताना डबना
तेल इकस मोहना ह्या काय तेलन्या पाची धारा
नवरदेव …वरी धरा
एक फूल तोड ओ सवासणी, द्या त्या नवरदेवना कानी
अर्थः हे काय सुताराकडुन घडवलेलं पाट, त्यावर कोर्‍या कपड्याची घडी, वर मोत्याने चौक भरलेला. ही काय आहे अतर कासाराकडची वाटी, त्यात विड्याचं पान, त्याच्या वर एका काडीला गुंडाळलेलं कच्चे सूत, वाटीत तेलीणकडचं तेल. अरे नंदुराया तेली, हा तुझ्याकडचा तेलाचा डबा, तुझ्या लाकडी घाण्यावर काढलेलं तेल, त्याच्या पाच धारा नवरदेवभाऊच्या डोक्यावर धरा गं सवाष्णींनो!!

देवांना आमंत्रण देणे: एका ताटात ५ कणकेचे दिवे ठेवुन त्यांच्या मध्यभागी कुलदेवतेचा टाक आणि आजुबाजुला तेलन पापड्या म्हणजे मैद्यात फक्त हळद कालवुन पापडांसारख्या लाटलेल्या (मीठ टाकत नाही) व तेलात तळलेल्या पापड्या. असं ताट देवाला ओवाळतांना पुढील गाणे म्हणतात.
बाकीचे हातात हळदी कुंकुने माखलेले तांदुळ घेउन देवांना आमंत्रण देतात.

कच्चा सुतना बाजूला, टाका देवना दरबारी
कोना घरीन सोबत, नवरदेवघरीन सोबन
आमना निवते र्‍हायजा, तप्ती आंघोळ करजा
चंदन टिलक लावजा, बहिण भाचीले मुळ जायजा
रंगीत वहील्या जुपजा, तुमन्या रावन्या पावन्या
बैलं तुमनं जुंगून पुर्‍हान राम सोडी देरे गाई
लक्ष्मण दूध लेरे धोई, सिता दूध ले ओ ताई
दूध तपे गर्मे गर्मे, या दूधनी पिवळी साय
वास स्वर्गे जाय, स्वर्गे लोक काय म्हणती
मीर्गी लोकात काय काम होती,
आपला वशीला नांदती, कन्या पुत्र उजती
अर्थः कच्च्या सुताच्या बाजुला देवांचा दरबारी म्हणजे
आपली कुलदेवता देवांना वशिला लावते.
निवतं म्हणजे आमंत्रण. आमचं आमंत्रण घ्या, तप्त पाण्याने आंघोळ करुन घ्या, चंदनाचा तिलक लावा, बहिणी भाच्यांना मूळ घ्यायला पाठवा. रंगित बैलगाड्यांनी तुमचे पाव्हणे रावळे सर्वांना घेउन या. रामा गाई सोडुन दे रे आणि लक्ष्मणा गाई धु म्हणजे दूध काढ, सितामाई दुध तापव, गरम दुधाची पिवळी साय, त्याचा वास स्वर्गात गेला तर स्वर्गातले लोक काय म्हणतात,” मृत्युलोकात काय काय कार्ये होतात..तिथले लोक आपल्या वशिल्याने कन्या/पुत्र उजवतात. “!


  • लग्नानंतर वधु वरांच्या आंघोळीच्या वेळी- दामेंडा

नवरदेवावर
सोनानी कुदाई रुपानं दांड, रुपानं दांड
खंदानी खंदा (गावाचे नाव) नी खाण, (गावाचे नाव)नी खाण
(गावाचे नाव)नी खाणनी रेवायी माटी, रेवायी माटी
ती माटी ती माटी तमाणे भरा, तमाणे भरा
तमाणे भरा रुमाले झाका, रुमाले झाका
वाजत गाजत कुमार घरी, कुमार घरी
कुमार भाऊ तु दामेंडा घडी, दामेंडा घडी
घरधनी जागाडे मायन्या बहिणी, मायन्या बहिणी
मायन्या बहिणी तुम्ही रांधाले इंगा, रांधाले इंगा
आणानी आणानी गंग्यानं पाणी, गंग्यानं पाणी
कणीक भिजील्या डाबान्या वाणी, डाबान्या वाणी
लोयाच भरील्या निंबुन्या फोडी, निंबुन्या फोडी
खिरच रांधिली कापुरना डेरा, कापुरना डेरा
भातच रांधिला मोगरान्या कया, मोगरान्या कया

पापड तयिला पुनीना चांद, पुनीना चांद
कुल्लाया तयिल्या सुर्याला तेज
बोंडेच काढीले मखमली गेंद, मखमली गेंद
शिय्याच वयल्या आसमानना तारा, आसमानना तारा
लाडुच बांधीला रामना चेंडु, रामना चेंडु
जेवाडा जेवाडा नवरदेवनं गोत, नवरदेवनं गोत
नवरदेवना गोतनी भुकमोड झायी, भुकमोड झायी
नवरीना बाप तो वाण्याघर जायी, वाण्याघर जायी
शेरभर आटा तो मोजीवं लयी, मोजीवं लयी
त्याबीवं आटानी चुटपुट झायी, चुटपुट झायी
बलावा बलावा गावना न्हायी, गावना न्हायी
भलाया पाटीलनी भलायी कयी, भलायी कयी
नवरदेवना बापनी हेटुयी झायी, हेटुयी झायी.

हा एक गंमतीशीर खेळ आहे. लग्न लावल्यानंतर वधु सासरी येते. तेव्हा हळद फेडण्याचा कार्यक्रम होतो. हळद लावल्यानंतर तिन दिवसाच्या आत फेडलीच पाहिजे असं म्हणतात, कारण हळदीच्या अंगाला बाहेरच्या बाधेचा धोका असतो.
शब्दार्थः 
दामेंडा: कुंभाराकडील मातीचं एक पात्र
र्‍हांदणे: स्वयंपाक करणे
जेवाडा: जेवायला वाढा.


नवरीवर

नवरदेव नवरी गं कशा न्हाती
तेच पानी गं बने जाती
तेच पानी गं मोर पेती
तठून मोर गं उधळीला
आंबा चाफ्यावर बसविला
आंबा चाफ्याचा हिरवा काचा
काय सांगस रे सगा भाचा
कंठी मिरविली चारी दिवसा
आंग मरदिलं हयदिचं
गया वेढिला पोयताचा
मनगट वेढिला काकणाचा
मरोठ भरीला कुंकवाचा
कपाय वेढिलं बांशीगाचं
कोरे घातली काजळाची
ओठ रंगीला नागीणीचा

खेळ
नवरा नवरी लक्ष्माबाई
नवरी गयी तिना मामांना गायी
मामाजी मामाजी आंदण कायी
दिसू वं भाच्याबाई कपिल्या गायी
कपिल्या गायनी धांड्यानी जोडी
धांड्यानी जोडीवर रंगीत गाडी
रंगीत गाडीवर पलंग-पेढी
पलंग-पेढीवर हंडा नी गुंडा
हंडा नी गुंडावर चरी ना परी
चरी नी परी वर समया चारी
इतलं लिशी वं परघर जाशी
आयबाना जीवले झया लावशी
सासरा म्हणे सून माले भागनी झायी
तांदुय पेरत देव्हारे येई
सासू म्हणे सून माले भागनी झायी
सोनाना पाऊल मन घर येई
अर्थः नवरी गेली मामाकडे, मामाला म्हणते,” मामा, मला लग्नात आंदण काय देतोस?”, मामा म्हणतोय देतो गं भाचीबाई, कपिला गाय देतो, कपिला गायीवर दोन वासरं/ बैलं देतो. बैलांवर रंगित गाडी, गाडीत पलंग, गादी, समया हे सगळं आंदण देतो. इथलं आंदण घेउन तु परक्या घरी जाशील. आई बापाच्या जीवाला घोर लावशील.

यानंतर नविन पद्धतीप्रमाणे कांकण सोडुन ते पाण्यात टाकुन, सुपारी पाण्यात टाकुन ते काढण्याचा खेळ होतो. नवरीचे कांकण सोडतांना नवरदेवाने एक हात वापरुनच सोडवायचे असते. तर नवरी दोन्ही हात वापरु शकते.

Post a Comment