Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Test link
Posts

 *उत्तरार्ध*


गागाभट्ट हे दिनकरभट्टाचे पुत्र असून त्यांना वडिलांनी गागा असें लाडकें नाव दिलें व तेंच पुढें प्रसिद्ध झालें. त्यांचे खरें नांव विश्वेश्वर होतें. त्यांनी उत्कृष्ट विद्या संपादन करून आपल्या घराण्याचा लौकिक वाढविला. काशीस राहिल्या वरहि ह्या घराण्याचे विवाहसंबंध दक्षिणेंत होत असत. शिवदिननाथाचे गुरु केसरीनाथ हे गागाचे मामा होते. मीमांसा, न्याय, अलंकार व वेदान्त या विषयांत गागा भट्टाची प्रवीणता विशेष होती. दिनकरोद्योत ग्रंथांत त्यांच्या वडिलांनी पुष्कळ विषय सोपे म्हणून सोडून दिले होते त्यांची पूर्तता गागाभट्टाने केली. त्यामुळें हेमाद्रीच्या चतुर्वर्गाचिंता मणींप्रमाणेंच दिनकरोद्योताची योग्यता मोठी आहे. जैमिनी सूत्रांवर गागाभट्टाची टीका आहे. शिवाय न्यायशास्त्रावरील भट्टचिंतामणि व कायस्थधर्मप्रदीप उर्फ गागाभट्टी हे त्याचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. गागाभट्ट शके १५९५ (स. १६७३) त दक्षिणेंत आले व शके १५९६ च्या हिंवाळयांत काशीस गेले असा अंदाज आहे. या सुमारासच बाळाजी आवजीनें गागाभट्टाकडून कायस्थधर्मप्रदीप उर्फ गागाभट्टी रचून घेतला. तो बहुधा शके १५९६ तील ज्येष्ठ शु. १३ व वद्य ९ यांच्या दरम्यान संपूर्ण झाला असावा. छत्रपतींच्या ग्रंथालयांत न्यायाधीश व पंडितराव या पोथीचा उपयोग करीत. कायस्थांचे धर्म आचार व संस्कार बाळाजी आवजीच्या संमत्तीनें गागाभट्टानें ठरवून दिलें. यांत महाराजांच्या राज्यारोहणाचा उल्लेख आहे. यांत वेदमंत्राचे अर्थ संस्कृत अनुष्टुप्छंदांत आणून ठेविले असून सर्व संस्कार अमंत्रक दिले आहेत. राजवाडे यांनां सातारकर महाराजांच्या दप्तरांत एक पोथी सांपडली तींत हा कायस्थधर्मप्रदीप व शिवराजप्रशस्ति अशीं दोन प्रकरणें आहेत. ती शके १५९५ च्या मार्गशीर्षानंतर रचलेली दिसते. प्रशस्तींत मुसलमानांचा निर्देश दैत्य शब्दानें केला आहे व महाराजांनीं ब्राह्मणरक्षण व श्रुतिस्मृतिशास्त्रांचा उद्धार केला असें म्हटलें आहे. तसेंच विजापूरकर वहलोल खानाची छाती फोडल्याचा (पराभव केल्याचा शके १५९५ चा) हि उल्लेख आहे.
गागाभट्टाच्या विद्वत्तेसंबंधानें दक्षिणेंत मोठा लौकिक असून दक्षिणेंतील ब्राह्मणवृंदावर त्याची छाप मोठीं होती. त्यास मराठी राज्याचा व दक्षिण पंडितांचा विशेष अभिमान असून शिवाजी महाराजांचा लौकिक माहित होता. त्यांच्या मनांत शिवाजीविषयीं आदर असल्यामुळें त्यांनी मुद्दाम दक्षिणेंत येऊन आणि पैठण वगैरे ठिकाणच्या अनेक विद्वानांचें अनुमत घेऊन शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक नेटानें पार पाडला, शिवाय महाराष्ट्रराज्यसंस्थापना ही महाराष्ट्रीय पंडिताकडून होण्यांत एक प्रकारें औचित्यहि होतें.
सोळाव्या व सतराव्या शतकांत हिंदुस्थानांतील राजे रजवाडयांच्या व मुसुलमान बादशहांच्या दरबारीं या घराण्यांतील विद्वान पुरुषांस मोठा मान मिळत असून धर्म-कृत्याच्या प्रसंगीं त्यांस बोलावण्यांत येत असे. अद्यापीहि बनारस येथें त्या घराण्यास अग्रपूजेचा मान मिळतो. भट्ट घराण्यास ''ते जनतेचें (सेवा करणारें) घराणें होतें'' असें कै. मंडलिक म्हणतात.
लोकांच्या धर्मव्यवस्थेचे निबंधग्रंथ या भट्टांनी लिहिले म्हणून मोठया धर्मकृत्यांच्या प्रसंगी भट्ट घराण्यांतील पुरुषांस अध्यक्षस्थान देण्याचा रिवाज सर्वत्र आहे. या ग्रंथांत जुन्या स्मृती जमेस धरून व ठिकठिकाणचे आचार संकलित करून त्यांनी व्यवस्थित पद्धती बांधून दिल्या. एकाच घराण्यांत असे एकसारखे विद्वान पुरुष निपजल्याचीं उदाहरणें फारच थोडीं आढळतील. कमलाकर भट्टाचे वंशज कांतानाथभट्ट (मिर्झापूर येथील संस्कृत पाठशाळेचे अध्यापक) यांनी भट्टवंशकाव्य नांवाचा ग्रंथ लिहिलेला आहे.

Post a Comment