एक होती ठम्माबाई
तिला सोशल वर्कची घाई
रात्रंदिवस हिंडत राही
पण वर्कच कुठे उरले नाही
वर्क थोडे बाया फार
प्रत्येकीच्या घरची कार
नोकर – शोफर – बेरा – कुक
घरात आंबून चालले सुख
घराबाहेर दुःख फार
करीन म्हणते हलका भार
कार घेऊन निघते रोज
हरेक दुःखावरती डोज –
पाजीन म्हणतेः पिणार कोण ?
सगळ्या जणींना करते फोन
” मला कराल का हो मेंबर ?”
” अय्या , सॉरी , राँग नंबर !”
” सगळ्या मेल्या मारतात बंडल ”
म्हणून स्वतःच काढते ‘ मंडळ ‘!